📖उत्पत्ती १५-१७
तू पाहणारा देव
पाहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर."..✍🏼
उत्पत्ती १६:६
अब्रामाची बायको साराय हिला ह्यावेळेपर्यंत मूलबाळ झाले नव्हते म्हणून तिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. ती गर्भवती झाली आणि हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली. त्यामुळे साराय तिचा जाच करू लागली. तेव्हा सारायच्या जाचाला कंटाळून ती तिला सोडून पळून गेली. हागारच्या बाबतीत पाहिले असता हे लक्षात येते की, तिला किती त्रास झाला असेल, तिला त्या घरामध्ये कुठलेही सुख, आपलेपणा मिळत नसेल, प्रेम मिळत नसेल. सहनशक्तीची परिसीमा गाठत तिने घरातून पळून जाण्याचा विचार केला. ती रानात 'शूर' च्या वाटेने निघाली. 'शूर' म्हणजे 'भिंत', ती जीवनाच्या अंतिम घटकेला जणू पोहचली होती. अशा बिकट अवस्थेत या झऱ्यापाशी परमेश्वराचा दूत तिला भेटला. परमेश्वराच्या दूताने दिलेले आशीर्वादाचे निवेदन अतिशय उत्साहवर्धक व प्रेरणादायी होते. यामुळेच कदाचित तिला नवीन आशा आणि धैर्य मिळाले असेल. जो परमेश्वर तिच्याशी बोलला, तिने त्या देवाला *"तू पाहणारा देव"* असे नाव दिले. 'परमेश्वर प्रत्येकाचीच कशी काळजी घेतो' ह्याचे ती सर्वकाळ एक उदाहरण ठरली आहे.
प्रिय देवाच्या लेकरांनो, आज आम्ही अनेक कठीण परिस्थितीतीतून, संकटांतून जात आहोत. पूर, भूकंप, रोगराई, कोरोनासारखी जागतिक महामारी, युद्धे, अपघात यांनी आपले अस्तित्व, आपले जीवन घाबरवून सोडले आहे. परमेश्वराच्या दृष्टीने व स्वतःच्या दृष्टीने आम्ही स्वतःला अपात्र समजत असू, पापाच्या गुलामीत असू किंवा पापापासून सूटका मिळविण्याची धडपड करत असू, दुःख, निंदा, अश्रू व वेदना या सर्व गोष्टी परमेश्वर पाहात आहे. कदाचित आमची सहनशक्ती संपली असेल. परमेश्वर व परमेश्वराच्या लोकांसाठी केलेली चांगली कार्ये सुद्धा आम्हाला निराश करीत असेल, दाविदाप्रमाणे वाटले असेल, *"मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो." ( स्तोत्र ५५:६)* परंतु आम्ही हे लक्षात ठेवावे की, परमेश्वर सदोदित आमच्याजवळ आहे. त्याचे नेत्र आम्हाला पाहात आहेत, अजमावत आहेत. तो आमची काळजी घेत आहे. तो आम्हाला म्हणत आहे, *"माझ्या मुला, माझ्या मुली, माझी नजर ( डोळे) तुझ्यावर लागलेली आहे. तुझ्या दुःखात तू कदाचित माझ्या सहवासापासून दूर पळत असशील, पण तू माझ्या नजरेसमोरून दूर जाऊ शकणार नाहीस, माझा आशीर्वाद खचितच तुझा पाठपुरावा करील. तू कधीच हरवलेल्या अवस्थेत जाणार नाहीस. रानात सुद्धा सुखकारक झरा मी निर्माण केला आहे."*
प्रियांनो, प्रभू येशू आम्हाला पाहातो. त्याने आमचे गतआयुष्य पाहिले आहे, तो आमचा भविष्यकाळही पाहातो. तो आमचा त्याग कधीच करणार नाही. त्याचे आशीर्वाद सर्वदा आमच्याबरोबर आहेत. कोणतीही परिस्थिती असो तो आम्हाला निश्चितच "विजयशाली" व "गौरवशाली" असे करील. कारण तो आमची काळजी घेतो. तो आमच्यावर प्रेम करतो. तो "आम्हाला पाहणारा देव" आहे. वचन सांगते, *"तुझा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर सदैव असते." ( अनुवाद ११:१२)* परमेश्वर आमचा त्याग कधीच करणार नाही परंतु आम्हीही कधीच त्याला सोडून जाऊ नये. त्याचा त्याग करू नये. कारण आम्ही परमेश्वरापासून दूर गेलो तर आमचे पतन होईल आणि त्यामुळे आमचा नाश होईल. म्हणून परमेश्वराला सोडून देण्याची चूक आम्ही कधीच करू नये. सदैव त्याच्या जवळ राहावे
