एस्तेर || पुस्तक ||
एस्तेर शास्त्रामधील जुन्या कराराचे 17 वे पुस्तक आहे. एस्तेरचे इब्री नाव 'हदस्सा' होते ज्याचा अर्थ "मेंदीचे झाड" असा आहे आणि एस्तेर ह्या नावाचा अर्थ "गुपित" किंवा "लपलेला" आहे व पर्शियन भाषेत "बाबेलचा तारा" असा आहे. हे पुस्तक पांच इब्री गुंडाळ्यांपैकी (मेगिल्ला), (मेगिल्लात एस्तेर)एक होते. ह्या पुस्तकामध्ये 10 अध्याय व 167 वचने आहेत. जुन्या करारामध्ये इतिहासाची 12 पुस्तके आहेत व हे शेवटचे पुस्तक आहे. ही गोष्ट ख्रि.पू. 483-473 ह्या दरम्यान घडली जेव्हा पर्शियाचा राजा अहश्वेरोश राज्य करीत होता. ह्या पुस्तकाचा लेखक कोण हे माहित नाही परंतु काही अभ्यासकांच्या मते हे पुस्तक मर्दखय ह्याने पवित्र आत्म्याच्या सहाय्याने लिहिले आहे. जुन्या करारातील ह्या पुस्तकामधील सर्वात मोठे वचन एस्तेर 8:9 हे आहे.या पुस्तकाचा मुख्य विषय पर्शियामध्ये बंदिवासात असलेली एक इब्री स्त्री जिचे नांव हदस्सा होते व नंतर ती एस्तेर नावाने ओळखू लागली, व त्यानंतर ती पर्शियन साम्राज्याची राणी बनली, व तिने तिच्या लोकांच्या संहाराला विरोध केला.
एस्तेर बन्यामीन वंशातली, अबीहइलची मुलगी होती व तिचे तिच्या चुलत भावाने म्हणजेच मर्दखयने पालन-पोषण केले. मर्दखय हा बाबेलने पकडून नेलेल्या बंदिवानांपैकी एकाचा नातू होता.
ह्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये, राजा अहश्वेरोश व त्याची राणी वश्ती ह्यांच्याविषयी लिहिले आहे.
दुसऱ्या अध्यायामध्ये, एस्तेर ही राणी कशी बनली ह्याबद्दल लिहिले आहे.
तिसऱ्या अध्यायामध्ये, अगागी हामानाने यहुद्यांचा नाश करण्याकरिता कट आखला त्याविषयी लिहिले आहे.
4थ्या अध्यायामध्ये, एस्तेरला कटाविषयी माहित होते व मदतीकरिता मर्दखय एस्तेरचे मन वळवतो हे वर्णन आहे.
5ते 9 अध्यायामध्ये, एस्तेर राजाला तो कट सांगते, हामानाला फाशी होते व कशाप्रकारे मर्दखय परकीय राज्यामध्ये महत्वाचा व्यक्ती बनतो व यहुद्यांचा विजय होतो ह्या सर्व घटनांचे वर्णन केले आहे. त्याच अध्यायामध्ये यहुदी पुरीम सण साजरा करतात हे दाखवले आहे.
शेवटच्या 10व्या अध्यायामध्ये, अहश्वेरोश राजाच्या साम्राज्याचा विस्तार होतो व तसेच मर्दखय ह्याचा राजाच्या खालोखाल दर्जा वाढतो व यहुद्यांमध्ये तो थोर होतो हे वर्णन आहे.
मर्दखय बुद्धिमानी, दयाळू होता व त्याचा देवावर विश्वास होता. तो धैर्यवान व आशावादी होता. तो हामानाला भीत नव्हता. तो खूप हुशार होता. परिस्थिती कशी हाताळावी हे त्याला बरोबर माहित होते. यहुद्यांबरोबरचे त्याचे वागणे खूप चांगले होते आणि तो योसेफ व दानिएल नंतर बंदिवासात गेलेला तिसरा व्यक्ती होता, ज्याला परकीय साम्राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा दर्जा प्राप्त झाला होता आणि ह्या तिघांमध्ये मर्दखयाची सफलता /प्राप्ती खूप मोठी होती.
पुरीम हा सण वार्षिकरित्या कसा सुरू झाला हे समजणे हा ह्या पुस्तकाचा महत्वाचा उद्देश्य होता आणि अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीमध्ये यहुद्यांचा कसा बचाव झाला ह्याची लोकांना आठवण व्हावी हा ही एक उद्देश्य होता. ह्या पुस्तकाची दुसरी महत्वाची बाब म्हणजे एक बंदिवान असलेली यहुदी स्त्री परकीय राज्याची राणी बनते आणि आपल्या यहुदी वंशाला परकीय भूमीवर संहारापासून वाचवते.( हे ते यहुदी होते जे बंदिवासातले 70वर्षे पूर्ण होऊन सुद्धा यरुशलेममध्ये परतले नाहीत किंबहुना ते पर्शियामध्येच स्थायिक झाले).
ह्या पुस्तकाची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाचे नाव प्रत्यक्षपणे नमूद केले गेले नाही, परंतु आपल्या लोकांना वाचवण्याचा देवाचा समय उत्तम आहे हे ह्यामध्ये दिसून येते, आणि हे पुस्तक प्रार्थना करा, वाट पाहा आणि देवाला त्याचे कार्य करु द्या ह्याची आठवण करुन देते. (पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारात दोनच पुस्तके आहेत ज्यामध्ये देवाच्या नावाचा अगदी सरळ उल्लेख केलेला नाही आहे).
देव महान आहे, सर्वव्यापी आहे आणि तो नेहमी आपल्या लोकांची काळजी घेतो. देवाची स्तुती असो. आमेन.
