📖उत्पत्ती १-४
खरा प्रकाश
तेव्हा देव बोलला, "प्रकाश होवो," आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले.
उत्पत्ति १:३,४
परमेश्वराने प्रकाश बनवला तो जगाची निर्मिती करण्यामधील पहिला दिवस होता. देवाने प्रथम प्रकाशाची निर्मिती केली. कारण प्रकाश म्हणजे जीवन, प्रकाश म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय. सर्वत्र अंधकार होता, म्हणून देवाने सर्वप्रथम प्रकाशाची निर्मिती केली. आणि प्रकाश चांगला असल्यामुळे अंधकारापासून त्याला वेगळे केले, ज्याप्रमाणे प्रभू विश्वासणाऱ्यांना जगातून निवडून घेतो, जगापासून वेगळे करतो. तोच मनुष्यमात्राचा प्रकाश म्हणजेच जीवन आहे आणि खरा प्रकाश म्हणजेच येशू ख्रिस्त हा अंधारात प्रकाशतो, परंतु अंधाराचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, तो अंधार दूर करितो. वचन सांगते की, *"तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही." ( योहान १:५)*
प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हां विश्वासणाऱ्यांनाही प्रकाश असे म्हटले आहे, *"तुम्ही जगाचा प्रकाश आहात;" ( मत्तय ५:१४)* आणि त्याची इच्छा आहे की आमचे जीवन प्रकाशासारखे असावे आणि आमच्या जीवनाद्वारे इतरांना प्रकाश मिळावा, दिवठणीवर ठेवलेला प्रकाश जसा इतरांना अंधकारातून बाहेर काढण्यास मदत करतो, त्याप्रमाणे, त्या प्रकाशासारखे आमचे जीवन असावे. येशू ख्रिस्त म्हणतो, *"त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा." ( मत्तय ५:१६)* आमच्याकडे पाहून इतरांनी देवावर विश्वास ठेवावा, इतरांचे जीवन बदलावे आणि *खरा प्रकाश जो येशू ख्रिस्त* हा त्यांच्या जीवनात यावा आणि त्यांची पापमय जीवने बदलून परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावे. त्यांच्या जीवनाद्वारे प्रकाश प्रकाशित व्हावा.
आपली सत्कर्मे म्हणजे आम्ही आमचा द्वेष, मत्सर करणाऱ्यांस प्रीती दाखवावी, संकटात असलेल्यांना धीर द्यावा, त्यांना संकटांतून बाहेर पडण्यास मदत करावी, कलहाच्या, वाद विवादाच्या प्रसंगामध्येही शांती ठेवावी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांवर आणि आपल्या शत्रूंवरही प्रीती करावी. म्हणजे आमच्या आचरणातून, आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त दिसून येईल, आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा स्वभाव दिसून येईल. प्रेषित पौल म्हणतो, *"कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यांत दिसून येते." ( इफिस ५:८,९ )* आमच्या जीवनाद्वारेही ही प्रकाशाची फळे दिसून आली पाहिजेत तरच आम्ही दिवठणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे इतरांना मार्गदर्शक असे होऊ. आणि ख्रिस्ताप्रमाणे इतरांसाठी प्रकाश असे होऊ.
प्रियांनो, आम्ही जेव्हा ख्रिस्त म्हटलेल्या प्रकाशात चालतो तेव्हा आमच्या जीवनातील अंधकार नाहीसा होतो. आणि हा प्रकाश आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तर तो सदैव आमच्यासोबत राहातो. म्हणून आजच आम्ही ह्या प्रकाशाचा अंगीकार केला पाहिजे, त्याला आमच्या जीवनात प्रकाशण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे, त्याला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिले पाहिजे. कारण आपला प्रभू येशू म्हणतो, *"मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील." ( योहान ८:१२)
आपल्या जीवनाद्वारे, सत्कर्मे करून, चांगले आचरण करून पुत्राचे प्रतिबिंब पाडा आणि त्याच्याद्वारे इतरांना प्रकाश द्या.
.jpeg)