बायबलच्या जुन्या करारात ‘उत्पत्ति’ हे पहिले पुस्तक आहे.
‘उत्पत्ति’ या शब्दाचा ग्रीक भाषेत अर्थ आहे सुरुवात. हे पुस्तक मानव इतिहासाची सुरुवात, पापाची सुरुवात आणि उद्धाराच्या योजनेची सुरुवात यांविषयी सांगते. उत्पत्ति पुस्तकात सृष्टीच्या आरंभाचे वर्णन करणाऱ्या दोन महान कथा आहेत. पहिली कथा उत्पत्ति 1:1-2:3 आहे आणि दुसरी कथा उत्पत्ति अध्याय 2:4-25 या दोन्ही कथा आपल्याला सांगतात की परमेश्वर हा जीवनाचा प्रेमळ सृष्टीकर्ता आहे. तोच आकाश व पृथ्वीचा आणि त्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टींचा सर्जनहार आहे. परमेश्वराच्या वचनांमुळे आकाश आणि पृथ्वी अस्तित्वात आली. भूमीने त्याच्या वचनाचे पालन केले आणि सर्व प्रकारच्या वनस्पती उत्पन्न केल्या. परमेश्वराने पृथ्वीच्या धुळीतून पशू आणि मनुष्याची निर्मिती केली. आदमाने परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांना नावे दिली. जेव्हा परमेश्वराने हव्वेला आदमाजवळ आणले,
तेव्हा आदमाने एक सुंदर कविता म्हटली आणि अशा प्रकारे या जगातील पहिला विवाह झाला.
परमेश्वराने आदम व हव्वेला आशीर्वाद दिला आणि त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान केल्या. ते अदनाच्या बागेत राहत होते. परमेश्वराने त्यांना एक काम सोपवले त्याच्या सृष्टीची राखण करण्याचे. त्यांना त्या बागेची काळजी घ्यायची होती. परमेश्वर म्हणाला बागेतील सर्व झाडांचे फळ तुम्ही खा, पण भले आणि वाईट याचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ मात्र खाऊ नका. आदम व हव्वा परमेश्वराच्या आज्ञेत राहिले आणि त्याच्यासोबत पूर्ण ऐक्यात जीवन जगत होते. ते एकमेकांशी
आणि संपूर्ण सृष्टीशीही ऐक्यात होते. सातव्या दिवशी
परमेश्वराने आपल्या सृष्टीच्या कार्यातून विश्रांती घेतली.
हा दिवस सब्बाथ म्हणून ओळखला गेला. या सात दिवसांनी हे सिद्ध केले की सृष्टी पूर्ण झाली आहे. आणि तेव्हा परमेश्वराने आनंदाने म्हटले ‘हे जग अतिशय चांगले आहे.